नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत कोट्यवधी कार्यकर्ते जनतेत राहतात, लोकांचे दुःख आणि वेदना समजून घेतात. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. पुढील ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही. तुम्ही परदेशात आहात आणि माझे विधान ऐकू शकत नाही, हे मला माहिती आहे, या शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
अमित शाह यांनी दिल्ली जल बोर्डाच्या (डीजेबी) ८,९४१ कोटी रुपयांच्या ४३ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. आंदोलने आणि निदर्शनांनी काहीही साध्य होत नाही. तुम्ही ज्या भागातून निवडून आला आहात, तिथल्या लोकांसाठी काम करा. पंजाबच्या जनतेने ठरवले आहे की, यावेळी पंजाबमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही
अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की, पुढील ३० वर्षे तुमचा नंबर येणार नाही. मला माहिती आहे की, तुम्ही माझा आवाज ऐकू शकत नाही, तुम्ही परदेशात कुठेतरी बसला आहात. तुम्ही तिथे का बसला आहात, हे तुमचे वैयक्तिक आयुष्य आहे. एकदा का तुम्ही दिल्लीत उतरलात की, माझे म्हणणे ऐकून ठेवा, पुढील ३० वर्षे तुमचा नंबर लागत नाही, असे अमित शाह यांनी ठामपणे सांगितले.
पंजाबमधील तुमचे सरकार उलथवून टाकल्यावर...
तुम्ही यमुनेचेच उदाहरण घ्या. तुमचा पक्ष ३० वर्षे सत्तेत होता, पण तुम्ही यमुनेसाठी काहीही केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, भारतीय जनता पक्षाला यमुनोत्रीपासून संगमापर्यंत संपूर्ण यमुना स्वच्छ करण्याचा मान मिळेल. याआधी 'आम आदमी पक्ष' आणि काँग्रेस सबबी सांगत असत. आमच्याकडे अरविंद केजरीवाल यांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत, पण पंजाबमधील तुमचे सरकार उलथवून टाकल्यानंतरच आम्ही ती देऊ, असा पलटवार अमित शाह यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधी घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी मतचोरीचे आरोप करतात. बंगालमध्ये ५४ वर्षे, अरुणाचल प्रदेशात १२ वर्षे आणि दिल्लीत १८ वर्षे एकही निवडणूक जिंकलेली नाही, अशी आकेडवारी देत अमित शाह यांनी टीकास्त्र सोडले.